-भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल एक महिना होत आला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्यात १ जून ते २७ जूनपर्यंत ४३.३ टक्के पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत सरासरी फक्त १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परिणामी अनेक तालुक्यात मृग नक्षत्र समाप्तीनंतरही खरीप हंगामातील पेरणीची कामे प्रतीक्षेत आहेत.
चालू वर्षी वरुणराजाचे अर्थातच मान्सूनचे दहा दिवस अगोदर आगमन होणार असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र मान्सूनच्या प्रवासाला अनुकूल वातावरण न लाभल्याने पावसात खंड पडला आहे. सद्यस्थितीतही मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल घडून आल्याने जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे मान्सूनचे वेध सर्वांना लागले आहेत.
जिल्ह्यात हवेली तालुक्यात ३१.६ टक्के पाऊस झाला असून अवघे पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यात १२.८ टक्के पाऊस झाला असून पाचच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भोर तालुक्यात २८.७ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात २१.७ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वेल्हा तालुक्यात २२.९ टक्के पाऊस झाला असून सात दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात १०७.६ टक्के पावसाची नोंद झाली असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
खेड तालुक्यात ५१.५ टक्के पावसाची नोंद असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आंबेगाव तालुक्यात ७७.१० टक्के पावसाची नोंद असून दहा दिवस अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शिरूर तालुक्यात ८५.६ टक्के पावसाची नोंद असून फक्त सहा दिवसच अडीच एमएमपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामती तालुक्यात ११८.३ टक्के पाऊस झाला असून आठ दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात ८७.४ टक्के पावसाची नोंद असून आठच दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात ९१.५ टक्के पावसाची नोंद असून अकरा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर पुरंदर तालुक्यात ५३.३ टक्के पावसाची नोंद असून अवघे सहा दिवस अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे.
एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी १२ दिवसच अडीच एमएमपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. सध्या खरीप हंगामातील आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. खरीप हंगामात शेतकरी बाजरी, भुईमूग, मूग, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांची पेरणी करत असतो. मात्र दमदार पावसाअभावी अनेक भागात पेरणीची कामे खोळंबली आहेत.
सध्या हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही पिकांच्या पेरणीचा कालावधी समाप्त होऊ लागला आहे. त्यामुळे जमिनीला चांगली ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवू शकते. पावसाळा सुरू होऊन तीस दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांनी सूर्यफूल, तूर, बाजरी व मका पिकांची पेरणी करावी.
- प्रमोद सावंत, कृषी अधिकारी, पुणे.