पुणे : मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून, शुक्रवारी तो राज्याच्या दक्षिण कोकणात अर्थात तळ कोकणात, तसेच गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची स्थिती अनुकूल असल्याचा अंदाज भारतीयशास्त्र हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनने सध्या उत्तर कर्नाटकच्या कारवार, चिकमंगळूर, बंगळुरू व धर्मापुरीपर्यंत धडक मारली आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगालचा, हिमालयाचा काही भाग व सिक्किममध्ये पोहोचण्याचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
राज्यात गुरुवारी कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही गुरुवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसेच तुरळकठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान शनिवारपर्यंत कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने मंगळवारी जारी केलेल्या अंदाजानुसार जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जसे दक्षिण कोकणाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, गोवा, मुंबईचा काही भाग व पश्चिम विदर्भाचे अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत होसाळीकर म्हणाले, ‘राज्याच्या अगदी तुरळक ठिकाणी अशी स्थिती असण्याचा अंदाज आहे. मात्र, याची संभाव्यता केवळ ३० टक्केच आहे. याचाच अर्थ येथेही सरासरीइतका किंवा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ७० टक्के आहे. या महिन्यात राज्यात इतरत्र मान्सूनचे वितरण हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, तर मध्य भारतात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल.’
पुण्यात आज हलक्या पावसाची शक्यता
पुण्यात बुधवारी कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शहरात गुरुवारी आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, तसेच हलका पाऊस पडण्याची व सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.