पुणे : नैऋत्य मान्सूनचे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि लगतच्या क्षेत्रात पुढील ४८ तासांत आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याचवेळी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील २ दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
यावर्षी मान्सून हा नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागराच्या खालच्या भागात अंदमान समुद्रापर्यंत खालच्या वातावरणात सध्या ढगांची गर्दी झालेली दिसून येत आहे. त्यामुळे अंदमान, निकोबार बेटांच्या परिसरात पुढील ५ दिवस गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ मेपर्यंत निकोबार बेटांच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रापासून दक्षिण भारताच्या खालच्या भागात असलेल्या जोरदार प्रवाहामुळे दक्षिण भारतात केरळ, माहे, तामिळनाडू, कराईकल, पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भागाच्या आतील भागात गडगडाटी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, रायलसीमा भागात पुढील ५ दिवसांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. ढगाळ हवामान व मान्सूनपूर्व सरी यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात १७ मे रोजी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात १७ व १८ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह कडकडाट होण्याची शक्यता आहे.