पुणे : केरळमध्ये निर्धारित वेळेवर म्हणजे १ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने कर्नाटकातील कारवारपर्यंत त्याच्या नव्या तारखांनुसार ४ जूनपर्यंत व्यवस्थित मजल मारली़ मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे त्याच्या पुढच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे़ गेले ४ दिवस तो कारवार येथेच थबकला आहे़ येत्या दोन दिवसांत गोवा, तळकोकण, कर्नाटकाचा काही भाग, रायलसीमा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात मान्सूनच्या आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे.
मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलत असल्याचे लक्षात आल्याने यंदा हवामान विभागाने मान्सूनच्या देशातील विविध शहरांतील आगमनांच्या तारखा नव्याने निश्चित केल्या आहेत़ मागील ३० वर्षांतून मान्सून आगमनाच्या वेळा लक्षात घेऊन या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार गोव्यात मान्सूनचे ५ जून रोजी आगमन अपेक्षित होते़ तर कोल्हापूरला ८ जून, सातारा येथे ९ जून, पुणे, बारामती येथे १० जून आणि मुंबईला ११ जून रोजी मान्सूनचे आगमन अपेक्षित होते़ मात्र, तसे झाले नाही़ आता अनुकूल स्थितीमुळे त्याची वाटचाल वेगाने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.09 व १० जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर ११ जून रोजी कोकण, मराठवाडा, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़12 जून रोजी कोकणच्या किनारपट्टीलगत वादळी वाऱ्याची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़