पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रवाताच्या स्थितीसोबतच अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांमुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, रविवारनंतर पाऊस कमी होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील ओडिशाच्या अंतर्गत भागात तसेच दक्षिण छत्तीसगडवर चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती तेलंगण, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रावर दिसत आहे. त्यामुळे मध्य भारतावर ढगांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच अरबी समुद्रावरून येणारे पश्चिम वारे सशक्त झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता वाहून आणली जात आहे. दुसरीकडे राज्यावर ९० अंशांच्या स्थितीत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. सतेच मान्सूनची मूळ द्रोणिका रेषादेखील सध्या इंदूर व बैतूलजवळून अगदी खालून जात आहे. या चारही प्रणालींमुळे मान्सून राज्यात सक्रिय झालेला दिसून येत आहे.
याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘या स्थितीमुळे राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय झाल्याने रविवारपर्यंत (दि. १०) बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवसांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण व गोव्यात पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रातही ढगांची गर्दी झाली असून घाट परिसरात विशेषतः नाशिक, सातारा व पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस पाऊस कायम राहील. मराठवाड्यात पुढील ४८ तासांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातदेखील पुढील ४८ तासांत बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.’