पुणे : अकरा दिवसांच्या खंडानंतर मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल झाले असून सोमवारी (ता. २७) अरबी समुद्र आणि गुजरातच्या बहुतांश भागात प्रगती केली आहे. मॉन्सून पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरच्या काही भागात दाखल होणार आहे. तर राज्यातही कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात सध्या उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच या परिसरावर चक्राकार वारे सुद्धा वाहत आहेत. यामुळे मध्य प्रदेश व लगतच्या परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा तर, राजस्थान व परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार झाले आहे.
जोरदार पावसाची शक्यता
हवामानाची सद्य स्थिती पाहता पुढील तीन दिवसांत पश्चिम राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ ही देण्यात आला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात पुढील चार दिवसांत विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
कोकणाला झोडपले
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडला. तर कोल्हापूरच्या दक्षिण भागातही चांगला पाऊस झाला. मराठवाड्यातील उस्तामानाद लातूर जिल्ह्यातही पाऊस झाला.