पुणे : एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने विविधांगी एकपात्री कलाविष्कारांचे महिनाभर आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २) ‘रेशीम लडी’ या प्रयोगाने या मालिकेस प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन प्रयोग रंगला. हे अविष्कार २९ जानेवारीपर्यंत विनामूल्य असून त्यातून एकपात्री प्रयोगांचे विश्व अनुभवता येणार आहे.
परिषदेच्या कलाकारांनी नव्या वर्षाची सुरुवात म्हणून प्रेक्षकांसाठी ही दर्जेदार कार्यक्रमांची भेट आणली आहे. आठवड्यातून तीन दिवस कलाकार प्रयोग सादर होणार असून त्याची सुरुवात शनिवारी (दि. २) झाली. सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकातील निळू फुले रंगमंच येथे एकपात्री प्रयोग आयोजित केले होते. पहिल्याच दिवशी प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
दि. २९ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या अविष्कारांमध्ये उणे दूरदर्शन, कथाकथन, विनोदी एकपात्री, रंगबेरंगी, गणिती गुदगुल्या, भंडारी-टेन्शन खल्लास, स्वभाव राशींचे, तऱ्हा एका गावाची, शेजारी शेजारी असे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. हे प्रयोग निळू फुले रंगमंच आणि सुदर्शन रंगमंच येथे विनामूल्य पाहता येतील. विजयकुमार कोटस्थाने, भाग्यश्री देशपांडे, मकरंद टिल्लू, कल्पना देशपांडे, रोहित जोशी, राहुल भालेराव, मंजिरी धामणकर, विश्वास पटवर्धन, चैताली माजगावकर-भंडारी आदी कलाकार एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत.
चौकट
“आम्ही सादरीकरण करू शकू का हा प्रश्न कलाकारांसमोर होता. पण, आता मोठ्या उत्साहाने आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आम्ही सज्ज आहेत. आठवड्यातून तीन दिवस प्रयोग होणार असून कलेला व्यासपीठ मिळाल्याने कलाकार आनंदीत आहेत.”
-दीपक रेगे, अध्यक्ष एकपात्री कलाकार परिषद