खोर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ऑनलाइन सभेला प्राधान्य दिले असता खोर ग्रामपंचायत याला अपवाद आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करत खोरची मासिक सभा एका लहानश्या हॉलमध्ये झाली. विशेष म्हणजे यावेळी २० जण उपस्थित होते. त्यामुळे शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे.
दरम्यान, यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी एम जी पाडुळे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी तर थेट प्रशासनालाच बोट दाखवले. ऑनलाइन बैठक घ्यावा असा कोणताही आदेशनाही असे सांगितले. त्यामुळे कोरोनाचे नियम खोर ग्रामपंचायतीला लागू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत होऊ लागला आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढत असून दररोज बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. दौंड तालुक्या किंबहूना खोरसह परिसरात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही येथील ग्रामपंचायतीने मासिक सभा घेतली. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी ऑनलाइन सभा घेण्यावर भर दिला आहे. मात्र, तरीही एका लहानच्या हॉलमध्ये खोर ग्रामपंचायतीची सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खोरच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीवरील मोटारींच्या अतिक्रमणावरही चर्चा करण्यात आली मात्र, कोणाचीही तक्रार नसल्याने कारवाई करता येणार नसल्याचे सरपंच व ग्रामसेवकांनी सांगितले.
गटविकास अधिकाऱ्यांना हवी आहे तक्रार
दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने मासिक सभा, बैठका होत आहे. खोर ग्रामपंचायतीने नियमांचे उल्लंघन करत मासिक सभा घेतली असेल तर त्यासंदर्भात कोणताही तक्रार अर्ज आला नाही. याची सभेबाबत अहवाल मागवून घेऊ त्यानंतर पुढील कार्यवाही करु असे सांगितले. एकूणच गटविकास अधिकाऱ्यांनाही कोरोना परिस्थितीचे गांभीर्य नाही. एका छोट्याश्या हॉलमध्ये २० जणांच्या उपस्थितीत सभा झाली. तरीही पुढील कार्यवाहीसाठी त्यांना हवी आहे ती तक्रार. त्यामुळे गावाला कोरोनामुळे लागू केलेले निर्बंधही शिथील करून टाकले पाहिजे अशी चर्चा ग्रामस्थांतून रंगली आहे.