स्टार १२१८
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी एमएसटी (मासिक पास )उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, पुणे - मुंबई दरम्यान रोज हजारोंच्या संख्येत प्रवास करणारे प्रवासी आजही मासिक पासपासून वंचित आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पुणे - मुंबई अप-डाऊन करणारे प्रवासी मासिक पास मिळत नसल्याने रोज आरक्षित तिकीट काढून प्रवास करीत आहेत. पुणे- मासिक पाससाठी पूर्वी ८४० रुपये इतके दर होते. आता मासिक पास नसल्याने ६३०० रुपये त्यांना महिन्याकाठी खर्चावे लागत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणांत प्रवासी मासिक पास काढून मुंबई गाठत. मात्र, कोविडनंतर रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट, पॅसेंजर, एमएसटी या सर्वांवर निर्बंध आणले. मागच्या महिन्यात पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना मासिक पासची सुविधा केली. मात्र, त्यास फारसा चांगला प्रतिसाद नाही. पुणे ते मुंबई दरम्यान मासिक पासवर प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त आहे. जवळपास ४००० प्रवासी मासिक पास काढून पुणे - मुंबई प्रवास करीत असत. मात्र, आता मासिक पास ही सुविधा बंद असल्याने प्रवासी नाईलाजाने आरक्षित तिकीट काढून प्रवास करीत आहेत. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बॉक्स १
सध्या सुरू असलेले रेल्वे :
पुणे - मुंबई दरम्यान डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी , डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- गोरखपूर, पुणे - पटना एक्स्प्रेस, पुणे - जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे - हावडा , पुणे- दानापूर एक्स्प्रेस , उद्यान एक्स्प्रेस, राजकोट - सिकंदराबाद एक्स्प्रेस, दादर - चेन्नई , विशाखापट्टणम - कुर्ला एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस ,आदी प्रमुख एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून धावत आहे.
बॉक्स २
लोकलला सवलत , मग आम्हाला का नाही :
दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल सेवेसाठी मासिक पास दिला जात आहे. मात्र, मेल, एक्स्प्रेस व सुपरफास्टच्या मासिक पासवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र ही सवलत दिली गेली नाही. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांना एक न्याय आणि मेल एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर मात्र अन्याय असे का, असा प्रश्न आता प्रवासी करीत आहेत.
बॉक्स ३
भुर्दंड किती दिवस सहन करायचा :
मेल एक्स्प्रेस व सुफ़रफ़ास्ट गाड्यांचे एमएसटी अद्याप सुरू न झाल्याने आम्हाला दर महिन्याला मोठा आर्थिक फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने मेल एक्स्प्रेसच्या गाड्यांसाठी एमएसटी तत्काळ उपलब्ध करावे.
नागेश मस्के, प्रवासी
कोट १ कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दीवर निर्बंध लावले आहे.त्यात शिथिलता मिळाल्यानंतरच मासिक पासबद्दल निर्णय घेतला जाईल. तो देखील वरिष्ठ स्तरावरच घेतला जाईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.