पुणे : मुंबईतील घाटकाेपरमधील चिरागनगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांसाेबत साेमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
साेमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत भव्य स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईतील चिरागनगरी येथील घर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हे स्मारक हाेणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे पूनर्वसन करण्यात येणार आहे. हे स्मारक खासगी कंपनीकडून न करता म्हाडा, शिवशाही प्रकल्प, एमएमआरडीए यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे बाधीत हाेणाऱ्या 700 घरांचे पुनर्वसन त्याच भागात करण्यात येणार आहे. 2020 हे आण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे, त्याच्या आत स्मारकाचं काम सुरु करण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.