थोरल्या बाजीरावांचे स्मारक दख्खनी शैलीत मध्य प्रदेशमध्ये साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:03 AM2021-08-24T10:03:27+5:302021-08-24T10:03:47+5:30
अखेरपर्यत अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी असे घट्ट केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव समाधी जीर्णोद्धार प्रकल्प जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मध्य प्रदेशात नर्मदातिरी रावेरखेडी येथे होणारे थोरल्या बाजीरावांचे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व्हावे, ही मराठी इतिहासकारांची मागणी मध्य प्रदेश सरकारने मान्य केली. केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी तशा सूचना जाहीर कार्यक्रमातच मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागाला दिल्या.
अखेरपर्यत अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी असे घट्ट केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव समाधी जीर्णोद्धार प्रकल्प जाहीर केला.
त्याची शैली थोडी मुघलकालीन स्थापत्यशैलीतील होती. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी याला हरकत घेत हे स्मारक मराठा स्थापत्यशैलीत व काळ्या पाषाणात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने लगेचच पूर्वीचा विकास आराखडा बदलून नवा तयार केला. हा आराखडा १०० कोटी रुपयांचा आहे. त्यातील २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन १८ ऑगस्टला बाजीरावांच्या जयंतीदिनी झाले.
या स्मारकात आता काळ्या पाषाणातील शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची बुरुजांसहितची प्रतिकृती असेल. बाजीराव पेशव्यांचा एक भव्य पुतळा, भव्य घाट, बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, भव्य संग्रहालय, पर्यटन निवास, व्यापारी संकूल, समाधिस्थळाकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता निर्माण करण्यात येणार आहे.
माळवा-बुंदेलखंडची जनता बाजीरावांचे ऋण कदापि विसरणार नाही, असे या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर, खासदार गजेंद्र चौहान, होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर, बाजीराव-मस्तानीचे वंशज अवेश बहाद्दूर, पुण्यातून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, बाजीराव स्मारक समितीचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.