नीरा : शाहूछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अपरिचित नाव म्हणजे लकडे. मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळाच्या सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावात शाहूछत्रपतींच्या सरदाराचे स्मारक शोधून काढले. सरदार तुकोजी लकडे यांची ही समाधी संतोष पिंगळे व सुमित लोखंडे या इतिहास अभ्यासक मित्रांनी पुरंदर तालुक्याच्या कोळविहीरे गावात नुकतीच शोधून काढलेली आहे.
याबाबत माहिती देताना लोखंडे म्हणाले, "पेशवे दफ्तरातील खंड २२ मध्ये वाचनात आलेल्या एक पत्रात कोळविहीरे आणि तुकोजी लकडे यांचा संबंधाने उल्लेख आढळला होता. त्यानुसार कोळविहीरे गावात ''''धनगराचा घुमट'''' म्हणून एक ऐतिहासिक वास्तू असल्याचे मित्र शितोळे आणि खैरे यांनी कळविले. त्यांनतर मरहट्टी मंडळाचे अभ्यासक संतोष पिंगळे, दत्तराज कर्णवर यांच्यासोबत निखिल लकडे आणि बाळासाहेब लकडे यांच्यासोबत अभ्यासदौरा करण्यात आला. त्यादरम्यान कोळविहीरे गावात प्राचीन गोधन वीरगळ आणि तुकोजी लकडे यांचे मध्यकालीन समाधी स्मारक असल्याचे निश्चित झाले.
आख्याकियेनुसार कोळविहीरे हे ग्रामनाम वाल्मिकऋषी यांचा गावाशी असलेला संबंध दर्शविते. तर प्रथम बाजीराव पेशव्यांच्या काळात झालेल्या उत्तरेतील मोहिमांत असंख्य सरदारांनी साहसी कार्य करून स्वराज्य अटकेपर्यंत वाढविले. या सर्व सरदारांना वतने, इनामे व सरंजाम देऊन गौरविण्यात आले होते. त्यात तुकोजी लकडे यांचाही समावेश होता. ते पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावचे पाटील होते. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार तुकोजीरावांचा मृत्यू हा नोव्हेंबर १७२८ मध्ये झाला. तर कोळविहीरे गाव त्यांच्या वतनी पाटीलकीचे गाव असल्याने येथे त्यांचे स्मारक तयार करण्यात आले.
अभ्यासादरम्यान समाधीच्या दर्शनी भागात दोन्ही बाजूला शरभ शिल्प असून मध्यात कमलचिन्ह कोरलेले आढळून आले. तसेच एक शिलालेखही सापडला असून पहिल्या ओळीतील अक्षरे ‘तुकोजी’ हे स्पष्ट आहेत तर पुढील ओळी व अक्षरे नष्ट झाली आहेत. समाधीच्या आत तुकोजीरावांची अश्वारूढ मूर्ती असून अतिशय सुंदररित्या कोरण्यात आली आहे. त्यांचा मुकुट, हातात खंडा आणि तत्कालीन सरंजामदाराचा पेहराव त्यातून निदर्शनास येतो. सोबतच त्यांच्या अश्वाची देखील मूर्ती असून युद्धात त्यांचा अश्व देखील कामी आल्याचे समजते. समाधीबद्दल गावकऱ्यांना माहिती असल्याने ते धनगराचा घुमट अथवा लकडेचा घुमट असे सांगतात. समाधीचे पूर्ण बांधकाम हे घडीव काळ्या पाषाणामध्ये केले असून समाधीवर तत्कालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव जाणवतो त्यातूनच समाधीच्या कळसाची रचना ही घुमटाकार आहे.
मध्यकालीन इतिहासात तुकोजी लकडे, हैबतराऊ लकडे, खेळोजी लकडे, मल्हारजी लकडे या वीरांनी पराक्रम गाजविला. या लकडे घराण्याला सुपे बारामती परगण्यातील ''''कोळविहिरे'''' आणि पारनेर परगण्यातील ''''भाळवणी'''' या गावची वतनदारी होती. सन १७१९ मधील मराठ्यांच्या दिल्लीवरील मोहिमेत ''''खेळोजी लकडे'''' नामक शिलेदाराचे पथक सहभागी होते. आणि बडोद्याचे गायकवाडांसोबत भाळवणीचे वतनदार मल्हारजी लकडे यांचे पथक असत. तसेच, सन १७२८ साली मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमेत उज्जैनीचा सुभेदार दयाबहाद्दर विरुद्ध जी निकराची लढाई झाली त्यात ''''तुकोजी लकडे'''' यांना वीरमरण आल्याचा संदर्भ इनामपत्रात सापडतो. लढाईचे नेतृत्व हे चिमाजीआप्पा करीत होते. अझमेरा येथे झालेली हि लढाई तत्कालीन राजकीयदृष्ट्या इतकि महत्त्वाची होती कि या दयाबहादूरच्या मृत्यूनंतरच उत्तरेतील माळव्यात मराठ्यांचा अंमल खऱ्या अर्थाने सुरु झाला असे सांगितले जाते.
ऐतिहासिक पत्रातील उल्लेख पुढीलप्रमाणे
"हैबतराऊ लकडे बिन तुकोजी पाटील लकडे मौजे कोलविरे प्रांत सुपे याचे बाप तुकोजी लकडे स्वामीकार्यावरी दयाबाहाद्दर याचे जुंजी पडिले याजकरिता इनाम पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने" वरील इनामपत्रं हे पेशवे दफ्तरातील २६ नोव्हेंबर १७२८ रोजीचे असून त्यात कोळविरे गावचे ''''तुकोजी लकडे पाटील'''' यांना स्वराज्यासाठी लढताना वीरमरण आले, त्यांनी केलेल्या पराक्रमाची दखल घेत त्यांचे पुत्र ''''हैबतराऊ लकडे'''' यांना वंशपरंपरागत इनाम देण्यात आल्याचा उल्लेख आहे. दुर्दैवाने संशोधकाला या इनाम गावाचे नाव न कळल्यामुळे छपाईत त्यांनी * * * अशी खून दर्शविली आहे. परंतु, पुढील अभ्यासात आपण या मूळ पत्राचा शोध घेऊ" अशी माहिती संतोष पिंगळे यांनी दिली.
स्मारक असल्याचा पुरावा-
- घुमटाकार समाधीवरती काही ऐतिहासिक राजचिन्हे व एक शिलालेख आढळून आला.
- शिलालेखाच्या पहिल्या ओळीत ''''तुकोजी'''' अशी अक्षरे स्पशपणे दिसून येतात.
- समाधीचे बांधकाम घडीव काळ्या पाषाणामध्ये करण्यात आले आहे.
- जमिनीपासून साधारणपणे दोन ते तीन फूट उंचीच्या दगडी चिरेबंदी चौथऱ्यावर समाधी उभी आहे.
- चौरसाकृती चौथऱ्याची लांबी साधारणपणे १५ ते १८ फूट.