पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार 'होर्डिंग वॉर' बघायला मिळाले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी (दि. २७ जुलै) वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेच्यावतीने प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण करण्यात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण केला आहे. यावेळी गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह महाआरती देखील केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे. तसेच कोरोना व नैसर्गिक आपत्तीविरूद्ध लढण्याचे बळ मिळावे आणि पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली.
गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्ती यांच्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ताकद मिळावी. आणि ह्या सरकारला जनतेच्या सेवेची अधिकाधिक संधी मिळत राहो. तसेच राज्यातील सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडण्यासाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण तयार व्हावे. महाराष्ट्रासह संपूर्ण जगावरील कोरोना संकट दूर व्हावं. अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीत जास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी.
याप्रसंगी रवींद्र मिर्लेकर,संपर्कप्रमुख बाळाभाई कदम ,शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,राजेंद्र शिंदे,अशोक हरणावळ,नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर,उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.