पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक पालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शहरातील सर्व शिक्षण संस्थांनी शुल्कात ५० टक्के सवलत द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध संघटनांनी एकत्रितपणे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच, विद्यार्थी आणि पालकांची छळवणूक करणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महात्मा फुले मंडई येथून काढण्यात आलेल्या मोर्चात राजकीय व सामाजिक संघटनांसह पालक व विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या ''शुल्कासाठी शिक्षण संस्थांकडून पालकांची मानसिक छळवणूक केली जात आहे. तसेच १०० टक्के शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करणे, ऑनलाइन शिक्षण बंद करणे, गुणपत्रिका न देणे, शैक्षणिक साहित्य न पुरविण्याचे प्रकार शाळांकडून केले जात आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सर्व शिक्षण संस्थांनी ५० टक्के शुल्क माफ करावे,’’ या मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.या आंदोलनाचे महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे सुरेश जैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजिंक्य पालकर, संयोजन वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, अध्यक्ष वैभव वाघ, प्रशांत गांधी, अभिजित महामुनी यांनी केले.