वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद करून वीज बंद केली जाते. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्या पाऊस पडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा संकटकाळात वीज वितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारत वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. हतबल झाला आहे. अशावेळी वीज वितरण कंपनी करत असलेला हा प्रकार लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, सुरेश बागडे, सतीश पोखरकर, वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, बाजीराव महाराज बांगर यांची यावेळी भाषणे झाली. प्रभाकर बांगर म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीमालाला अगोदर हमीभाव द्यावा, अशी मागणी करून बांगर म्हणाले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आहेत. खताच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनामुळे देखील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषिपंपाची थकीत वीज बिले राज्य सरकारने माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बांगर यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी मागील थकबाकीच्या ऐवजी चालू महिन्याचे वीज बिल भरले तरी त्या शेतकऱ्याचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी काळुराम भागडे, सचिन पवार, नवनाथ आवटे, लहू पिंगळे, गणेश पोखरकर, धनेश पोखरकर, देवराम बांगर, हरिदास बांगर आदी उपस्थित होते.
फोटोखाली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला.