पुणे : महाराष्ट्र इंटक ही काँग्रेसप्रणित कामगार संघटना मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. केंद्र सरकारने कामगार व शेतीविषयक कायद्यात केलेली दुरूस्ती राज्यात लागू होणार नाही असा ठराव करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे.
इंटकच्या राज्य कार्यकारिणीत सर्व राज्य सदस्यांनी केंद्राच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. इंटकचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी ही माहिती दिली. इंटक ही देशातील सर्वात जुनी व मोठा कामगार संघटना आहे. असे असताना केंद्र सरकारने एकाही कामगार विषयक कायद्यातील चर्चेसाठी इंटकला विचारात घेतले नाही याबद्दल इंटकच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असे छाजेड म्हणाले.
राज्याला केंद्राने केलेली ही दुरूस्ती नाकारण्याचा पुर्ण अधिकार आहे, तसा त्यांनी तो जाहीरपणे अमलात आणावा असे इंटकचे म्हणणे आहे. त्यामुळेच सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यात हे कायदे नाकारत असल्याचा ठराव करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीच्या पुर्ततेसाठी म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले.