लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी एकच अर्ज असावा, यासाठी तयार केलेल्या ‘महाडीबीटी पोर्टल’वर ११ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदविली. त्यात सर्वाधिक अर्ज यांत्रिकी शेती अवजारांसाठी आहेत.
राज्यात प्रथमच इतक्या विक्रमी संख्येने योजनांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातही एक शेतकरी वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करू शकत असल्याने संख्येत मोठी वाढ झाली आहे. यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टरपासून ते पीक कापणी, मळणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येते. याच योजनेसाठी सर्वात जास्त म्हणजे १३ लाख ६५ हजार ७३० अर्ज आले आहेत.
ठिबक सिंचन योजनेचा खर्च हेक्टरी काही लाख रुपये असतो. पाणी वाचविण्यासाठी सरकारकडून ठिबक सिंचनाचा आग्रह धरला जातो. त्यामुळे या योजनेसाठी ४५ ते ५५ टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी ‘महाडीबीटी पोर्टल’वर ६ लाख ७० हजार १६६ शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. फळबाग योजनेसाठी ६ लाख २५ हजार ४८४ जणांनी अर्ज केले आहेत. विशेष योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लहान लहान अवजारांसाठी निधी दिला जातो. यात १ लाख ३१ हजार ४४१ जणांनी मागणी केली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर आलेल्या सर्व अर्जांची राज्यस्तरावर छाननी सुरू आहे. वर्गीकरणानंतर लाभार्थ्यांना तालुका स्तरावर पूर्वसंमती पत्र दिले जाईल. एखाद्या योजनेत निधी अपुरा व अर्जदार जास्त असतील, तर त्यासाठी सोडत काढून लाभार्थी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.