MHADA: म्हाडाच्या साडे चार हजार घरांसाठी दहा दिवसांत बारा हजारपेक्षा अधिक अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:10 PM2021-11-27T12:10:29+5:302021-11-27T12:13:02+5:30
पुणे म्हाडाच्या वतीने नितीन माने-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक ते दीड वर्षांत तब्बल तीन सोडती काढून नवा विक्रम केला आहे...
पुणे:पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने 16 नोव्हेंबर रोजी तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांना संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत 12 हजार 633 अर्ज आले आहेत. यामध्ये देखील फस्ट कम फस्ट सेलचे फ्लॅट तर दोन दिवसांत विक्री झाली आहे. अद्यापही ज्या लोकांनी अर्ज केले नाही त्यांना 16 डिसेंबर अखेर पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्याचे आवाहन पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.
पुणे म्हाडाच्या वतीने 8 वी ऑनलाईन सोडत जाहीर केली. यात २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे म्हाडाच्या वतीने नितीन माने-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक ते दीड वर्षांत तब्बल तीन सोडती काढून नवा विक्रम केला आहे. यामुळेच केल्या वर्षभरात हजारो गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.
आता नव्याने जाहीर केलेल्या 4 हजार 222 घरांसाठी नवीन वर्षांत ऑनलाईन लाॅटरी काढण्यात येईल. यासाठी आता पर्यंत १२६३३ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक ५३२ परांजपे अभिरुची परिसर, धायरी ( १RK ) येथील ७५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी ७२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०५ अर्जदारांनी अनामत भरली आहे. या ७५ सदनिका वितरित करून झाल्या आहेत. यावरून असे दिसून येत आहे की सोडतीसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपले रजिस्टेशन करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन माने-पाटील यांनी केले आहे.
अशी असेल घरांची सोडत
म्हाडा गृहनिर्माण योजना : 59 सदनिका
खाजगी बिल्डर 20 टक्क्यांतील घरे : 2945
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य : 2886
सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे : 16 नोव्हेंबर
ऑनलाईन अर्ज दाखल करणे अंतिम तारीख : 16 डिसेंबर
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती : 17 डिसेंबर
ऑनलाईन लाॅटरी : 7 जानेवारी 2022