नारायणगाव : लॉकडाऊन काळात नाही नाही म्हणता बरेच लग्न सोहळे पार पडले. कोरोनाची गंभीर दखल घेत काही जणांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करत घरच्या घरी चार दोन लोकात लग्न उरकले. तर कुणी प्रशासनाच्या निर्बंधांना धाब्यावर बसवत अगदी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळे पूर्ण केले. असेच एक लग्न नारायणगाव परिसरात आले होते. ह्या लग्नाला अनेक आजी, माजी राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यासह जवळपास २०० हुन अधिक लॊकांची उपस्थिती होती. मात्र दणक्यात बार उडवलेल्या ह्या लग्नाने आता आयोजक, वर- वधू कुटुंबांसह उपस्थित असणाऱ्या सर्वांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कारण ह्या लग्नाला उपस्थित असणाऱ्यांपैकी अकरा जण कोरोनाबाधित निघाले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याची समोर आली आहे. उद्या आणखी 12 जणांचे घेण्यात येणार आहे.
याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सह्याद्री भिसे (रा. येडगाव ता. जुन्नर) व हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीतील ओसारा हॉटेल मालकासह व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यास मर्यादित लोकांची दिलेली प्रशासनाच्या परवानगीस वाटण्याचा अक्षता दाखवित २०० हुन अधिक लोकांच्या उपस्थित लग्न सोहळा आयोजित केला होता.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा दि. १३ ऑगस्ट रोजी होता. या लग्न सोहळ्याकरिता सह्याद्री भिसे यांना पोलीस स्टेशनचे परवानगीनुसार जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वये २० लोक हजर रहावे याबाबत नमुद केले होते. परंतू, सह्याद्री भिसे यांनी त्यांच्याकडील लग्न कार्यास २० पेक्षा जास्त लोक जमविले व ओसारा हाँटेलचे व्यवस्थापक यांनी मंगल कार्यालयात २० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविली. त्यामुळे सह्याद्री भिसे व ओसारा हाँटेलचे व्यवस्थापक यांनी परवानगी मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन केले नाही. व तेथे येणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केले नसल्याचे दिसले व इतरांचे आरोग्य धोक्यात येईल असे वर्तन केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.