पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, यंदाही प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा प्रत्यक्ष प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा अकरावीच्या २७ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहणार आहेत. दरम्यान, येत्या सोमवारी (दि.१३) तिसऱ्या फेरीच्या प्रवेशाची यादी जाहीर केली जाणार आहे.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून एकूण प्रवेश क्षमतेच्या तुलनेत प्रवेशासाठी अर्ज करणारे कमी होत चालले आहे. यावर्षी सुद्धा प्रवेशासाठी १ लाख १२ हजार ९६५ जागा उपलब्ध असून, नोंदणी करणारे विद्यार्थी ८५ हजार ५१८ आहेत, तर अर्ज भरून लॉक करणारे विद्यार्थी ७७ हजार ८६ आहेत. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार आहेत.
इयत्ता दहावीचा विक्रमी निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु कोरोनामुळे बाहेरगावाहून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या कटऑफमध्ये सुद्धा घट झाली. तिसऱ्या फेरीचे प्रवेश सोमवारपासून सुरू होणार आहेत, तरीही प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नव्याने सुरू झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------------------