मार्च २०२० पासून कोरोना संकटाने डोके वर काढायला सुरुवात केली. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्येने उच्चाक गाठला होता. यावेळी शासकीय रुग्णालयातील इतर विभागांमध्येही कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सोय केली. त्यामुळे मोतीबिंदूसह डोळ्यांवरील इतर शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या. मर्यादित मनुष्यबळामुळेही इतर उपचार आणि शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर दोन महिने पुन्हा नेत्र शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या. या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. रुग्णसंख्या वाढू लागल्याने डोळ्यांवरील शस्त्रक्रिया पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाल्याने हा निर्णय घेतला असला, तरी गरजू रुग्ण, विशेषतः ज्येष्ठांना शस्त्रक्रियांअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात २०१९-२० या वर्षात २६८७ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२०-२०२१ या वर्षात केवळ २१८ शस्त्रक्रिया झाल्या. मंचर उपजिल्हा रुग्णालयात २०१९-२० या वर्षात ५९८ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२०-२१ या वर्षात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. सध्या औंध जिल्हा रुग्णालयात नेत्र उपचारांसाठी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे.
------
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून डोळ्यांवरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. मधल्या काळात कोरोना काहीसा ओसरल्यानंतर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या शस्त्रक्रिया बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रखडलेल्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.
- डॉ. शिरशीकर, नेत्रविभागप्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय