बारामती : कडाक्याच्या थंडीतही बारामती शहरात रविवारी (दि. ३) सकाळी उत्साही वातावरणात तिसरी शरद मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत साडेअकरा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. धावणाऱ्या स्पर्धकांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांचा समावेश होता. स्पर्धेत प्रथमच हाफ मॅरेथॉनचे आयोजन केल्याने राष्ट्रीय धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला़ स्पर्धेचे उद्घाटन बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ़ अनिल पाटील उपस्थित होते़ रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, रमणिक मोता, माजी नगराध्यक्ष जयश्री सातव, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात झाली.खेळाडूंचे स्वागत शरद मॅरेथॉन स्पर्धेचे अध्यक्ष सदाशिव सातव, कार्याध्यक्ष सचिन सातव, समन्वयक डॉ़ अरविंद बुरुंगले, गणपतराव तावरे यांनी केले़ या वेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. स्पर्धेत कमी वय असूनही यश प्रकाश मत्रे याने २१ कि़ मी़ ची हाफ मॅरेथॉन पूर्ण केली, तर ८६ वर्षांच्या आजोबांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला़ बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब बांगर यांनीदेखील हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. जलतरणपटू महेश सांळुखे व हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक देण्यात आले़ या वेळी बारामती टेक्स्टाईल्स पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही स्पर्धा पुढील वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर नेणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
साडेअकरा हजारांहून अधिक स्पर्धक
By admin | Published: January 04, 2016 1:03 AM