पंढरीनाथ नामुगडे-पुणे (कदमवाकवस्ती) : कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आहेत. फळबागा व तरकारीने शेतकऱ्यांना हात न दिल्याने ऊस हेच हक्काचे पीक वाटत होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुऱ्हाळे दौंड तालुक्यात आहेत. मात्र दौड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती,लोणी काळभोर यासह पन्नासहुन अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील तीन ते चार महिन्याच्या काळात घडलेला आहे
अर्जुन गायकवाड, गणपत चावट, बाबुलाल मोमीन, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, शंकर खोले फसवणुक झालेल्या प्रमुख ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे आहेत.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना मागील दहा पासुन बंद असल्याने, पु्र्व हवेलीमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दौंड व शिरुर तालुक्याताल साखऱ कारखान्यावर अंवलबुन रहावे लागते. लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात गुऱ्हाळे चालु असली तरी,पूर्व हवेलीमधील ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकाचे अनेक दलाल ऊसासाठी तालुक्यात फिरत आहेत. अशाच एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे परस्पर खर्च करुन शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत कदमवाकवस्ती येथील ऊस उत्पादक शेतकरी अर्जुन गायकवाड म्हणाले, लॉकडाऊन काळात दौंड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने कदमवाकवस्ती परिसरातील पन्नासहुन अधिक शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाला नेला होता. वरील सर्वच शेतकऱ्या्ंचे ऊसाचे पैसे वेळेवर मिळाल्याने, आमच्यासारख्या पंचवीसहुन अधिक शेतकऱ्यांनी मागील काही महिन्याच्या काळात संबंधित व्यापाऱ्याला ऊस दिला होता. मात्र नेलेल्या ऊसाचे पैसे देण्यास संबधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. वारंवार मागणी करुनही, व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना भेटण्याचे टाळत आहे. व्यापाऱ्याने दौंड तालुक्यातील ज्या ज्या गुऱ्हाळ चालकांना आमचा ऊस दिला अशा सर्व गुऱ्हाळ चालकांची भेट घेतली असता, व्यापाऱ्याने पैसे ऊसाचे पैसे परस्पर उचलल्याची माहिती मिळत आहे.
अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस या व्यापाऱ्याने नेला असल्याची माहिती मिळत आहे. वारंवार संपर्क साधुनही व्यापारी भेटत नसल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.- अर्जुन गायकवाड.