स्टार ११९२
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे स्टेशन येथून अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याचे व पैसे देण्याचे आमिष दाखवून १४ वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकांनी बलात्कार केल्याच्या घटनेने पुण्यासह राज्याला हादरवून सोडले. महिलांवर एका पाठोपाठ घडलेल्या घटनांनंतर शहरातील निर्जन स्थळांचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत असे ८ हजार हॉटस्पॉट आहेत. जेथे पोलीस नियमितपणे गस्त घालतात. आता या स्थळांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाव्य धोकादायक जागा शोधून त्यांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
शहरातील महत्त्वाचे पीएमपी बसथांबे, एसटी व रेल्वे स्थानके, अनधिकृत रिक्षा स्टँड, रेल्वे शंटिंग यार्ड, सुरक्षारक्षक नसलेली उद्याने किंवा उद्यानांचे वापरात नसलेली प्रवेशद्वारे, टेकड्या, सखल जागा, फुट ओव्हर ब्रीज, पुलाच्या खालील पार्किंग ठिकाणे आणि अंडरपास, वावर नसलेल्या पडिक अंधा-या इमारती, वाडे, अर्धवट किंवा चालू असलेली बांधकामे, नदीकाठ परिसर, गुन्हेगारी वस्त्या, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि निर्जन ठिकाणे यांचा समावेश आता माय सेफ पुणे या ॲपमध्ये करण्यात येत आहेत.
-------------------------
शहरातील महिलांविषयक दाखल गुन्हे
२०१८ - १४८१
२०१९ - १३९०
२०२० - १०५५
ऑगस्ट २०२१ अखेर - ४९१
-----------------------------
मागील आठवड्यात वानवडी व बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराचे दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा गंभीर गुन्ह्यास प्रतिबंध होण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाव्या धोकादायक जागा शोधून त्यांचा समावेश माय सेफ पुणे या ॲपमध्ये समाविष्ट करण्याची सूचना दिली आहे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर