अद्याप अस्पष्टता : दुष्परिणामांचे प्रमाण नगण्य असल्याने सामान्यांनी घाबरून न जाण्याचे वैद्यकतज्ञांचे आवाहन
पुणे : मार्च महिन्यापासून कोरोनाशी दोन हात करत असतानाच लसीकरण सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मानवी चाचण्यांमधून लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर तयार होणारी रोगप्रतिकारकशक्ती किती काळ टिकेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सहा महिने ते एक वर्ष प्रतिपिंडे (अँटीबॉडी) टिकू शकतात, असा अंदाज वैद्यकतज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
शनिवारी (१६ जानेवारी) देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या लसींच्या लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. कोव्हिशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये १० हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर प्रत्यक्ष प्रयोग झाला. यामध्ये लस ७५ टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. कोणतीही लस ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणामकारक असेल तर आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅकसिन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.
लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. त्यामुळे लसीकरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे, त्याप्रमाणे काही प्रश्नही आहेत. लस घेतल्यानंतर अँटिबॉडी किती काळ शरीरात टिकतील, लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही का, पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर दुसरा डोस घेता येईल का, अशा अनेक प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी ''लोकमत''तर्फे वैद्यकतज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.
-------
लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील, त्यांची पातळी काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लस ७५ टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. लस घेतल्यानंतर साधारण एक महिन्याने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. फ्ल्यूच्या लसीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. या लसीचे दोन डोस दिल्यावर विकसित होणाऱ्या अँटीबॉडी वर्षभर टिकतात. कोरोनावरील लसीबाबत सध्या तरी तसा अंदाज बांधता येऊ शकतो. कोणताही संसर्गजन्य आजार झाल्यास एक महिना लस देता येणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे पहिला डोस दिल्यावर कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजार झाल्यास लगेच दुसरा डोस देता येणार नाही. त्यामुळे बरे झाल्यावर एक महिन्याने दुसरा डोस देता येईल. मात्र, प्रत्येक निर्णय परिस्थितीनुसार अभ्यास करून घ्यावा लागेल.
- डॉ. भारत पुरंदरे, साथरोगतज्ज्ञ
-----
दोन्ही लसींच्या चाचण्यांमध्ये दोन्ही डोस दिल्यानंतर तीन महिने स्वयंसेवकांचे निरीक्षण करण्यात आले. म्हणजे, सध्या तीन महिन्यांचाच डेटा आपल्याकडे आहे. त्यामुळे लसीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडी किती काळ टिकू शकतील, हा अभ्यासाचा विषय आहे. पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाला तरी त्याचे स्वरूप अत्यंत सौम्य असेल. रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे लागणार नाही. रुग्ण पूर्ण बरा झाल्यावर चार आठवड्यांनी दुसरा डोस देता येईल. लसींच्या दुष्परिणामांबद्दल अनेक शंका, अफवा आहेत. मात्र, चाचण्यांमध्ये सुरक्षितता सिद्ध झाली आहे. त्यामुळे सामान्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. आपण जगाला बालकांच्या लसीकरण कार्यक्रमाचा आदर्श घालून दिला. त्याचप्रकारे, आता प्रौढ लसीकरण कार्यक्रम आपल्याला जगासमोर मांडता येईल.
- डॉ. अमित द्रविड, साथरोगतज्ज्ञ