पुणे : शिक्षणाची अनेक दुकाने केवळ पैसा मिळवून पदव्या वाटत आहेत. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानच मिळणार नसेल, तर अशा शिक्षणाला अर्थ नाही. त्यामुळे यापुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे शिक्षणात लवचिकता येऊन दर्जाही सुधारेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले. तसेच, केवळ शासकीयच नाहीत, तर सर्व खासगी संस्थांमध्ये गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वारजे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी संस्थेतील कलाशिक्षक यशवंत वेदपाठक यांनी कार्यक्रम सुरू असताना ‘देवेंद्र फडणवीस’ या नावातून साकारलेले गणरायाचे चित्र मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले. तसेच, ‘ज्ञानमय’ या नियतकालिकाचे प्रकाशन व संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले. संस्थेतर्फे मुख्यमंत्री शेतकरी मदत निधीसाठी १५ लाखांचा धनादेश फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आला.फडणवीस म्हणाले, ‘‘देशात तरुणाईचे प्रमाण अधिक असल्याने विकासाची चांगली संधी आहे. मात्र, त्यासाठी या तरुणाईचे रूपांतर कुशल मनुष्यबळामध्ये करणे आवश्यक आहे. त्याशिवाय २०२२पर्यंत भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद अशा सर्व व्याधींपासून देशाला मुक्त करून नवभारताची निर्मिती करणे अशक्य आहे. तरुणाईला योग्य दिशेने नेण्याची सर्वांत मोठी जबाबदारी शैक्षणिक संस्था व शिक्षकांची असेल. संस्था किती मोठी असली तरी त्या संस्थेतून दिले जाणारे संस्कार व मूल्ये महत्त्वाची आहेत. काही संस्थांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण तर संस्थांची दुकाने आहेत. विद्यापीठाचे काम केवळ गुणवत्ता राखण्याचे आहे. त्यामुळे महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्रयत्न केले जातील. मात्र, त्यांच्या गुणवत्तेसाठी कडक मानके असायला हवीत. तसेच कौशल्य शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्याची गरज आहे.’’शिक्षणसंस्थांचा प्रभाव वाढत असताना शिक्षणात संस्कारांचा अभाव असल्याबाबत बापट यांनी खंत व्यक्त केली. तर, एकबोटे यांनी शिक्षक व शिक्षकेतर भरती सुरू करण्याची मागणी केली.
पुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 2:32 AM