\Sलोकमत न्युज नेटवर्क
पुणे : शहरांतील विविध भागातील सायकल ट्रॅक केवळ नावापुरतेच उरले आहेत. ट्रॅकवरील विविध अडथळे, सलगता नसणे, वाहनांची ये-जा अशा विविध कारणांमुळे केवळ १० टक्के सायकलस्वार या ट्रॅकचा वापर करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावर केलेल्या सर्वेक्षणात एकुण ६७५ सायकलींपैकी केवळ ५५ सायकली ट्रॅकवरून गेल्याचे आढळून आले.
सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तीन रस्त्यांवर सहा ठिकाणी झालेल्या या सर्वेक्षणाअंतर्गत सकाळी, दुपारी व सायंकाळी प्रत्येकी ३० मिनिटे पाहणी करण्यात आली. यामध्ये मुख्य रस्त्यावरून जाणाºया सायकली व त्याच कालावधीत ट्रॅकवरून जाणाºया सायकलींची आकडेवारी संकलित करण्यात आली. त्यानुसार सकाळी ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक सायकलींचा वापर होत असल्याचे आढळून आले. यावेळेत एकुण ३४३ सायकली दिसून आल्या. त्यापैकी केवळ २३ सायकलस्वार ट्रॅकवरून गेले. तर ९.३० ते ११.३० या वेळेत केवळ ६७ सायकली दिसून आल्या. त्यातील पाच सायकलस्वारांकडून ट्रॅकला पंसती देण्यात आली. दुपारी १ ते ४ यावेळेत सर्वात कमी ६० सायकली दिसल्या. त्यापैकी १० जणांनी ट्रॅकचा वाप केला. सायंकळी ५ ते ७ या वेळेत सायकलींची संख्या वाढल्याचे दिसून आले. यावेळेत ७८ सायकलींपैकी १७ सायकलस्वार ट्रॅकवरून पुढे गेले.
-----------
सायकल ट्रॅक न वापरण्याची कारणे -
- ट्रॅकवरील विविध अडथळे
- लगतचा अरूंद पदपथ
- वाहनांची येजा
- ट्रॅकची गुणवत्ता
- ट्रॅकची सलगता व उपलब्धता
--------------
सर्वेक्षणात आढळून आलेली सायकलस्वारांची स्थिती
कालावधी सायकल ट्रॅकवरून मुख्य रस्त्यावरून
सकाळी (६ ते ८) २३ ३२०
सकाळी (९.३० ते ११.३०) ५ ६२
दुपारी (१ ते ४) १० ६०
सायंकाळी (५ ते ७) १७ ७८
-------------------------------------------------------
एकुण ५५ ५२०
-------------------------------------------------------
सायकल ट्रॅकची दुरावस्था, विविध अडथळे, ट्रॅक सलग नसणे आदी कारणांमुळे ट्रॅकचा वापर खुप कमी होत आहे. सकाळी लवकर व्यायामासाठी सायकलचा वापर करणारे अधिक असल्याने या कालावधीतील प्रमाण अधिक दिसते. पण त्यानंतर दिवसभर त्यात घट झाल्याचे दिसते. ट्रॅकचा वापर वाढविण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट
------------------