बारामती : उसाचे क्षेत्र वाढले असताना पुढील काळामध्ये साखर कमी व इथेनॉलचे उत्पादन जास्त घेतले तरच साखरेचे बाजार वाढतील. तसेच या इथेनॉलला देखील योग्य भाव मिळेल. यंदाच्या वर्षी 150 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. 62 रुपये प्रति लिटर प्रमाणे दहा हजार कोटी रुपयांचे इथेनॉल तयार होईल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
सहकारी साखर कारखानदारी समोरील प्रश्न व आव्हाने नेमके काय आहेत. याचा मागोवा घेण्यासाठी आयुक्त शेखर गायकवाड सध्या दौर्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गुरुवारी (दि. 3) इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळाशी गायकवाड यांनी चर्चा केली.
ते पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी सुरु झाल्यापासून सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र यंदाच्या वर्षी आहे. राज्यामध्ये साधारणपणे एक लाख हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. हा फार मोठा बदल आहे. दर 21 दिवसांनी सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल चे पैसे मिळत आहेत. त्यामुळे मागील वर्षी 40 कारखान्यांनी या एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना दिली होती तर यंदाच्या वर्षी सत्तर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. परिणामी सहकारी साखर कारखान्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी जर आम्ही सोडवू शकलो तर शंभर टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढेल. त्याच्या वर्षी माझ्या अंदाजानुसार 95 टक्के कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली असेल. आणि हे सर्वात मोठे यश असणार आहे, असेही यावेळी गायकवाड म्हणाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व संचालक मंडळ उपस्थित होते.
ऊस बिलातून वीज बिलाची वसुली नाही
यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली शासनाने करू नये. असा निर्णय आपण घेऊ नये, अशी मागणी केली. यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अशी वसुली होणार नसल्याचा खुलासा यावेळी केला.