पुणे : शहरातील रस्ते विकसन करताना त्यांचे डिझाइन (आखणी) कसे असावे याकरिता नागरिकांनीही आपल्या कल्पना मांडाव्यात़ याकरिता पुणे महापालिकेच्या पथ विभागाने आयोजित केलेल्या ‘स्ट्रीट डिझाइन’ या स्पर्धेकरिता पन्नासहून अधिक प्रवेशिका आल्या आहेत़
या सर्व स्पर्धकांना येत्या मंगळवारी सूस, बाणेरसह अन्य डीपी रस्त्यांवर नेऊन तेथील नागरिकांना कसे रस्ते हवे आहेत. त्याबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यारितीने रस्ता आखणी (डिझाइन) तयार करण्याबाबत माहिती दिली जाणार आहे़ या सर्वांनी १५ मार्चपर्यंत रस्त्याचे डिझाइन प्रोजेक्ट सादर करावयचे असून, यातील तीन डिझाइनला रोख पारितोषिक दिले जाणार आहे़ तसेच या डिझाइनचा वापर पुणे महापालिकेकडून तयार करण्यात येणाऱ्या नवीन रस्त्यांकरिताही करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली़
------------------
पुणे शहरातील रस्ते विकसन करताना महापालिकेने नागरिकांसाठी वेगवेगळ्या संकल्पनामार्फत चांगल्या सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ ‘स्ट्रीट डिझाइन’ ही स्पर्धा नवनवीन पर्याय निर्माण करण्यासाठी व सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केली असून, या स्पर्धेमुळे शहरातील अर्बन डिझाईनर, तरुण वर्ग व विद्यार्थी यांना नवनी संकल्पनेवर आधारित पादचारी मार्ग, सायकल मार्ग यासंह आकर्षक लोकाभिमुख डिझाइन करण्याची संधी मिळणार असल्याचे पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही़ जी. क़ुलकर्णी यांनी सांगितले़
----------------------------