लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतमध्ये एकाच दिवसात तब्बल ४ हजार १६८ प्रलंबित नोंदी निकाली काढण्यात आल्या. कोरोना महामारीमुळे महसूल विभागाच्या हजारो नोंदी प्रलंबित होत्या. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या महसूल अदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे तलाठी, सर्कल आणि तहसीलदार कार्यालयातील हेलपाटे वाचले आहेत.
जिल्ह्यात गती प्रशासन अभियान अंतर्गत दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्यात येते. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनमुळे बहुतेक महसुली कामे ठप्प झाली आहेत. यामुळेच जिल्ह्यात तब्बल तेरा हजारपेक्षा अधिक नोंदी प्रलंबित आहेत. नागरिकांना कोणतीही साधी, वारस नोंद दाखल करण्यासाठी, तलाठी, सर्कल यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यात कर्मचाऱ्यांकडून कोरोनाचे काम सांगून कार्यालयात उपस्थित न राहण्याचे प्रमाणदेखील वाढल्याने महिनोमहिने साधी नोंद दाखल करण्याचे काम देखील होत नाही. या पार्श्वभूमीवर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. या फेरफार अदालतीस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून, फेरफार अदालतीमध्ये साध्या ३३८२, वारस ६८४ तक्रारी १०२ अशा एकूण ४१६८ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या.
-----
जिल्ह्यात एकाच दिवसात निकली काढण्यात आलेल्या नोंदीची तालुकानिहाय माहिती
हवेली २५९, पुणे शहर २०, पिंपरी-चिंचवड १४८, शिरूर ३७४, आंबेगाव २४०, जुन्नर ४९३, बारामती ९३५, इंदापूर ४२०, मावळ १४७, मुळशी १२०, भोर १४४, वेल्हा ११६, दौंड ३६४, पुरंदर १२५, खेड २००, एकूण ४१६८.