पुणे : ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटातून संघटितपणे भीक मागण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले होते. चित्रपटातील ही कथा काल्पनिक नसून मुंबईपाठोपाठ पुण्यातही भीक मागणा-यांची संघटित टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे़ काही दिवसांपूर्वी कोंढवा पोलिसांनी रस्त्यावर भीक मागणा-यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली होती़ त्यांच्यातील ४६ जणांनी न्यायालयात तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम जामीन म्हणून भरून बेगर होममध्ये राहण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे़पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भिक्षेकºयांची संख्या वाढल्याचे जाणवू लागले होते़ ते मंदिर, मशिद किंवा चर्चच्या परिसरात भीक मागत असतात़ ज्येष्ठ नागरिक, महिलांनी भीक द्यावी, यासाठी ते त्यांच्या मागे मागे जात असत़ त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या़ नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेऊन कोंढवा पोलिसांनी तीन टप्प्यांत एकूण ६१ भिक्षेकºयांवर कारवाई करून त्यांची बेगर होममध्ये रवानगी केली़ ३ नोव्हेंबरपासून या कारवाईला सुरुवात केली होती़ प्रामुख्याने ज्योती चौक, कौसर मशीद, तालाब मशीद परिसरात ही कारवाई करण्यात आली होती़ या भिक्षेक-यांना न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी बेगर होममध्ये केल्यानंतर त्यांनी तातडीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले. पुढच्या दोन दिवसांत त्यांच्यातील २७ जणांनी ५ ते ७ हजार रुपये रोख जामीन भरून आपली सुटका करून घेतली़ याशिवाय जामिनासाठी वकिलांचा खर्च वेगळा़रस्त्यावर भीक मागणाºयांनी इतक्या तातडीने जामिनासाठी इतकी मोठी रक्कम उभी करून तीही अगदी दोन दिवसांत भरली़ ही रक्कम किमान सव्वा लाख रुपयांहून अधिक होत असून इतक्या तातडीने त्यांनी हे पैसे उभे केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ त्यामुळेच आता मुंबईप्रमाणे पुण्यातही भिक्षेकºयांच्या संघटित टोळ्या निर्माण झाल्या आहेत का, असा संशय व्यक्त केला जात आहे़ कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड म्हणाले, की नागरिकांच्या तक्रारीमुळे स्वतंत्र पथक तयार करून तीन टप्प्यात ६१ भिक्षेकºयांना पकडून न्यायालयात हजर केले़ तेथून त्यांची रवानगी बेगर होममध्ये केली़ राज्यात १४ बेगर होम आहेत़ त्यात चांगली सुविधा असते़ पुण्यातही फुलेनगर येथे बेगर होम आहे़ यांना पकडल्यानंतर अनेक चांगली लोकं त्यांना सोडविण्यासाठी पुढे आल्याचे दिसून आले़ काहींनी त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले़ त्यावरून हा संघटितपणे भीक मागण्याचा प्रकार असावा.रिमांडनंतर जामीन दिला जातोयाबाबत बेगर होमच्या अधीक्षिका शुभांगी घनवड -झोडगे यांनी सांगितले, की कोंढव्यातील पोलिसांनी २७ आॅक्टोबर, ३१ आॅक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी कारवाई करून भिक्षेक-यांना बेगर होममध्ये दाखल केले होते़ साधारणपणे बेगर होममध्ये दाखल झाल्यानंतर रिमांड कालावधीनंतर न्यायालयाकडून त्यांना जामीन दिला जातो किंवा त्यांना आणखी काही दिवस वाढविले जातात़गेल्या वर्षभरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी भिक्षेकºयांना येथे आणले गेले़ त्यातील ४६ जणांना जामीन मिळाला आहे़ त्यापैकी काहींना २ ते ३ दिवसांत, तर काहींना ६ दिवसांत जामीन मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली़
भिक्षेक-यांनी भरला दीड लाखाहून अधिक जामीन; संघटित टोळीचा संशय, ४६ जणांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 2:08 AM