काही वर्षांतच या उद्यानांमध्ये वृक्षप्रेमींना प्रत्येक ठिकाणी १०० हून जास्त जातींचे वृक्ष पाहायला मिळतील. पाषाणची आयसर संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवरातले औषधी वनस्पती उद्यान, डोणजे फाटा सिंहगड रस्त्यावरचा लेक्झोन हा माझा कारखाना आणि आतकरवाडी सिंहगड पायथ्याचे वल्कल वृक्ष-उद्यान हे वृक्ष विविधतेचे ४ हाॅटस्पाॅट आहेत. या उद्यानांमध्ये इतर वृक्षांखेरीज सह्याद्रीतील दुर्मिळ प्रदेशनिष्ठ वृक्ष जोपासले जात. शहरालगतची ही ४ उद्याने वृक्षप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहेत. यात हेरिटिएरा, टेट्रामेलिस, ॲन्टीॲरिस, कौशी, टूना, रोहन, करमळ, क्रोटाॅन, पेटारी असे दुर्मिळ वृक्षही आहेत.
अशा अतिदुर्मिळ जातींची रोपे मिळवणे किंवा तयार करणे खूप अवघड आणि कष्टाचे आहे. अनेक नर्सरींमध्ये इतर देशी वृक्षांबरोबरीने अशा आणखी जातींची रोपे तयार करणे आवश्यक आहे. अशी प्रत्येकी ५ किंवा १० मोजक्या जातींचे रोप-संवर्धन वृक्षप्रेमींना वैयक्तिकरित्या घरी बाल्कनीत, गच्चीवर किंवा फार्म हाऊसवर करता येणे शक्य आहे. यासाठी अधिक माहिती खालील ई-मेलवरून मिळू शकेल. अशा प्रयत्नातून तयार झालेली रोपे साधारण वृक्षलागवडीत न करता खास संरक्षित वृक्ष उद्यानांमध्येच करावी, असे डॉ. इंगळहळीकर यांनी सांगितले.
-----------------
कर्नाटक राज्यात अशी दुर्मिळ जातींची रोपे वन विभागाकडून त्यांच्या नर्सरीत तयार केली जातात आणि (फक्त कर्नाटकच्या) नागरिकांना सवलतीच्या किमतीत दिली जातात. याशिवाय कर्नाटकातले अनेक नागरिक, शेतकरी वन विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर दुर्मिळ वृक्षांची रोपे तयार करतात. पर्यावरणाखेरीज आपल्या प्रदेशाची वृक्ष विविधता जोपासण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
- डॉ. श्रीकांत इंगळहळीकर, ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक
--------------------
----------