कात्रज : राजकारणामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे फार असतात. मात्र प्रकाश कदम यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे पक्षात त्यांची वेगळी किंमत आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज येथे व्यक्त केले.नगरसेवक प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार यांनी सांगितले, की पर्यावरणप्रेमी प्रकाश कदम यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर स्वखर्चातून झाडे लावण्याचा केलेला निश्चय ऐकून मी अवाक् झालो आहे. हे कार्य करणे कोणाचेही काम नाही. त्यासाठी मनात जिद्द असावी लागते. प्रकाश कदम यांचे सामाजिक कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज हजारो नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार नितीन भोसले, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, वसंत मोरे, युवराज बेलदरे, राणी भोसले, अश्विनी भागवत, स्मिता कोंढरे, दिनेश धाडवे, उद्योगपती माणिकचंद दुगड, गणेश मोहिते, मिलिंद पन्हाळकर, सुरेश कदम, विजय कोलते यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन प्रगती फाउंडेशन व राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. परिसरातील ३२ विद्यालयांच्या सुमारे साडेतीन हजार खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना कदम यांच्यावतीने बक्षिसे देण्यात आली. तसेच केरळ पूरग्रस्तांसाठी ६१०० किलो धान्य व एक लाख ६१ हजारांचा धनादेश देण्यात आला. भागातील ६१ महिलांना शिलाई मशिनचे वाटपदेखील अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. प्रतीक कदम, प्रणव कदम व नेहा कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राजकारणात निष्ठेला अधिक महत्त्व- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 1:03 AM