पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल तीन कोटी ४२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
प्रशांत धनपाल गांधी (रा. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पथकाने केली. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे एक कार येत होती. पोलिसांना पाहिल्यावर कारचालक गोंधळला. पोलिसांनी ही संशयास्पद कार थांबविली. त्यानंतर तिची झडती घेण्यात आली. कारमधील डिकीतील बॅगांमध्ये रोकड आढळून आली. तसेच गाडीमध्ये दोन सीटच्या मध्ये एका बॅगेत रोकड लपविली असल्याचे आढळून आले.
प्रशांत धनपाल गांधी (वय ४७, रा. लासुर्णे, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा खत व्यवसाय, दूध व्यवसाय, किराणा दुकान व शेती व्यवसाय आहे. त्यानंतरही कार हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तेथे पैसे मोजण्याचे मशीन आणण्यात आले. पहाटेपर्यंत पैसे मोजण्याचे काम सुरु होते. एकूण ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपये आढळून आले. याबाबत सी आर पी सी कलम ४१ (डी) अन्वये हडपसर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली असून या रक्कमेबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले आहे.
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला गांधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रस्त्यावरील एका बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम कर्जापोटी भरायची आहे, अशी माहिती गांधी यांनी पोलिसांना चौकशीत दिली आहे.