पुणे : कोरोना काळात केलेल्या नियमभंगावर शहर पोलिसांनी १८८ कलमानुसार लोकांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात आता शहरातील पोलीस ठाण्यांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास गती घेतली आहे. शहरातील
सर्व ३० पोलीस ठाण्यांना याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात शहरातील विविध न्यायालयात एक हजारांहून अधिक दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयातून संबंधितांना नोटीस काढण्यात येत असून पोलिसांकडून ही नोटीस लोकांना घरी जाऊन बजावण्यास सुरुवात झाली असल्याचे माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
शहरात कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात कारण नसता घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी १८८ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या काळात २८ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या गुन्ह्यांची निर्गती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल झालेल्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेऊन दोषारोप पत्र तयार करुन न्यायालयात दाखल करण्यात येत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतून आतापर्यंत जवळपास प्रत्येकी ५० हून अधिक दोषारोपपत्र दाखल केली गेली आहेत. न्यायालयाने आता संपूर्ण वेळ सुरु झाल्याने या प्रक्रियेने वेग घेतला आहे. न्यायालयाच्या वेळेनुसार संबंधितांना नोटीस काढण्यात येत आहे. न्यायालयाची नोटीस पोलीस घरी जाऊन बजावत असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जात आहे. न्यायालयाकडून गुन्हा दाखल झालेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.