पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. परंतु, पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकही दिवस शाळेत न जाता थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांची संख्या एक लाख वीस हजारांपेक्षा अधिक आहे.
कोरोना रुग्ण काही प्रमाणात कमी झाले असले, तरी अद्याप कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. लसीकरणाशिवाय कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे वाटत नसल्याचे काही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय शाळा सुरू करणे अडचणीचे ठरणार आहे. सध्या लसींचा साठा उपलब्ध होत नाही. एकूण परिस्थिती लक्षात घेता पुढील सहा महिने, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवावे लागणार आहे. सध्या एकही पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठवण्यास उत्सुक नाही. तसेच, शिक्षकही शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या मनस्थितीत नाहीत.
--
ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य
जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले असून, इतर शाळांनीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू ठेवण्याची तयारी केली आहे. विद्यार्थी व पालक आरोग्याला अधिक प्राधान्य देत आहेत त्यामुळे जून महिन्यात ऑनलाइनच वर्ग सुरू होतील.
--
वर्षभर पहिलीचे वर्ग एकही दिवस ऑफलाईन पद्धतीने भरले नाहीत. परिणामी, पहिलीत प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याला एकही दिवस शाळेत येता आले नाही. जिल्ह्यातील सुमारे १ लाख २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मागील वर्षी पहिलीत प्रवेश घेतला आहे. शासन निर्णयानुसार या सर्व विद्यार्थ्यांना दुसरी प्रवेश दिले जाणार आहे.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
---
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या परिस्थितीत कोणताही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास उत्सुक असणार नाही. तसेच शासनाकडूनही शाळा सुरू केल्या जातील, असे वाटत नाही. सध्यातरी ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य दिले जावे.
- सुवर्णा सूर्यवंशी, पालक
--
सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद असल्या, तरी सध्य परिस्थितीत शाळेत पाठवून आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालण्यास पालक तयार नाहीत. शहरी भागात परिस्थिती भयानक असून ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांचे लसीकरण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत विचार केला जाईल.
- मनोज केदारे,पालक
--
अद्याप सर्वांचे लसीकरण झालेली नाही. तसेच दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील काही महिने ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे.
- संजय वंजारे, शिक्षक