लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने वाढू लागला असून, तरुणांमध्ये कोरोनाची लक्षणे नसले तरी ते कोरोनाचे प्रसारक ठरत असल्याचे निष्कर्ष टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. याच शिवाय माॅल, रेस्टॉरंट आणि लग्न समारंभ देखील एक मोठे कारण असल्याचे म्हटले आहे. परंतु, शुक्रवार (दि.५) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत अधिकचे निर्बंध लागू करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
टाटा इन्स्टिट्यूटला पुन्हा एकदा सध्या सुरू असलेले लसीकरण व कोरोनाची स्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर १२ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या बैठकीत पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.
शहर आणि जिल्ह्यात खूप झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या सुकाणू समिती बैठकीत शहर आणि जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्याची वेळ आल्यास काय परिणाम होतील याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास टाटा इन्स्टिट्यूटला सांगण्यात आले आहे. हा अहवाल शुक्रवारी (दि.५) रोजी सादर केला. दर शुक्रवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाते, पण अधिवेशन सुरू असल्याने पवार उपस्थित नव्हते.
आढावा घेऊन पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेणार
टाटा इन्स्टिट्यूटला सध्या सुरू असलेले लसीकरण व कोरोनाची वाढती संख्या याचा विचार करून पुन्हा एकदा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे १० मार्च रोजी पुन्हा एकदा सुकाणू समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ मार्च रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव बैठक होणार आहे. या बैठकीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल असे राव यांनी स्पष्ट केले.