पुणे: संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसेदेखील परत केले आहेत. पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त यांच्याकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत १०,००० अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण अर्जदारांपैकी ६९,१७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना लाभ मिळाला आहे..
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीपर्यंत राज्यात २ कोटी ५२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. तर पुणे जिल्ह्यात २० लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते. योजनेला १५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. तर १६ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जांची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाखांहून अधिक अर्ज आचारसंहितेत अडकले होते.
आचारसंहिता संपताच जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जाची छाननी केल्यावर आतापर्यंत ९,८१४ अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरले. शिवाय ५,७२४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले. या अर्जदारांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली आहे. एकूण प्रलंबित १२ हजार अर्जाची छाननी अद्याप बाकी आहे. याचाच अर्थ आतापर्यंत सुमारे ९९.४३ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी झालेल्या एकूण अजर्जापैकी ६९,१७५ अर्जाचे बँकेच्या खात्याशी आधार सीडिंग करणे राहिले आहे.