पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ८० वर्षांपुढील ज्येष्ठांना गेल्या पोटनिवडणुकांपासून घरबसल्या मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २६ लाखांहून अधिक ज्येष्ठांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यातील सर्वाधिक २ लाख ४८ हजार ५२५ मतदार एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. अशा ज्येष्ठांना नमुना अर्ज १२-ड भरून मतदान केंद्रावर न जाता मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येऊन प्रत्यक्ष मतदानाची इच्छा असल्यास अशा नागरिकांना तसेही करता येईल. त्यासाठी मतदान केंद्रांवर सहायक नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
राज्यात नुकतीच अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार राज्यात २६ लाख ७३ हजार ३९२ नागरिक ८० वर्षांपुढील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पुणे जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ५२५ मतदार आहेत, तर सर्वांत कमी १६ हजार ४२२ मतदार गडचिरोली जिल्ह्यात आहेत. अशा मतदारांना घरून मतदान करण्यासाठी नमुना अर्ज १२-ड भरून मतदान केंद्रावर न जाता मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे अर्ज मतदानाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसांच्या आत करणे अपेक्षित आहे. असे भरलेले अर्ज मतदान कर्मचाऱ्यांद्वारे वितरित आणि गोळा केले जाणार आहेत. याबाबत देशपांडे म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने हा एक पर्याय दिला आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना स्वयंसेवकांकडून मदत केली जाईल. अशा ज्येष्ठांना सुकर व्हावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर हलविली आहेत. तसेच राज्यात सुमारे १५० गृहनिर्माण सोसायट्यांची मतदान केंद्रे निवासी भागात तयार करण्यात आली आहेत.”
दिव्यांगांसाठीही सोय
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अंतिम मतदार यादीत राज्यात ५ लाख ९० हजार ३८२ मतदार दिव्यांग असल्याचे आकडेवारी सांगते. ही संख्या मतदारांनी नोंद केलेल्या माहितीनुसार आहे. प्रत्यक्षात ही संख्या जास्त असू शकते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८५ हजार २०० मतदार आहेत, तर सर्वांत कमी ४ हजार ८९४ मतदार मुंबई शहरात आहेत. याबाबत देशपांडे म्हणाले, “दिव्यांग मतदारांची ओळख पटवून त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे. ४० टक्के दिव्यांग असलेले मतदार घरबसल्या किंवा टपाली मतदानाची सुविधा वापरून मतदान करू शकतात. या ॲपमध्ये नोंद करणाऱ्या नागरिकाला त्यांच्या मोबाइलवर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल. अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणे आणि परत घरी पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे.”