डिंभे: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १९६ आंबेगावविधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. या मतदार संघामध्ये आंबेगाव तालुक्यातील २२६ व शिरूर तालुक्यातील ११५ मतदान केंद्राचा सामावेश असून एकूण ३४१ मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडत आहे.
१५७४९४ पुरुष मतदार तर १५१७०३ स्री मतदार असे एकुण ३०९२०६ मतदार विधानसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. घोडेगाव (ता.आंबेगाव) तहसील कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे. या वेळी निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
विधानसभा निवडणूका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.