पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम म्हणजेच अर्जाचा दुसरा भाग भरण्याला दि. २२ जुलैपासून सुरुवात झाली आहे. यात रविवारी सायंकाळपर्यंत ३२ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी आवडत्या महाविद्यालयांचे पर्याय ऑनलाइन नोंदवले आहेत. ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी कोटा पद्धतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ३१२ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी १ लाख ७ हजार ९९० जागा उपलब्ध आहेत. यापैकी २३ हजार ९२१ जागा कोटा पद्धतीने भरण्यात येत आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्जाचा भाग एक (नाव, पत्ता, जन्मतारीख, प्रवर्ग आदी माहिती) भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू होती; मात्र सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांना अर्जातील भाग दोन (गुण आणि महाविद्यालयांचे पर्याय) भरता येत नव्हते. त्यामुळे प्रवेशाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी २२ जुलैपासून भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत १३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी आवडत्या महाविद्यालयांचे पर्याय नोंदवले आहेत.
विद्यार्थ्यांना किमान एक, तर कमान १० महाविद्यालयांचे पर्याय भरता येणार आहेत. आणखी काही दिवस महाविद्यालयांचे पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासोबतच समितीकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://pune.11thadmission.org.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन समितीद्वारे करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
महाविद्यालये - ३१२
जागा - १,०७,९९०
अर्ज नोंदणी - ९७,१६७
ऑनलाइन पडताळणी अर्ज - ३८,६७६
केंद्रावर जाऊन पडताळणी - ३२,४७१
अर्ज लॉक - ७५,४२२
कोटा प्रवेश प्रक्रियेसाठी आलेले अर्ज - ४४९४