धायरी : अपना है दिन यह आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो, ऐसे जागो रे साथियो, दुनिया की आँखें खोल दो खोल दो, लहरा दो लहरा दो... या देश भक्तीपर गाण्यावर ताल धरत सुमारे ३७०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी भारताच्या तिरंग्याची मानवी प्रतिकृती साकारत मानवंदना दिली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती नऱ्हे येथील झील एजुकेशन सोसायटीमध्ये साकारण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीने अनोखा विक्रम साकारला. या उपक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांच्या हस्ते झाली. या उपक्रमामध्ये संस्थेचे ३७०० हून अधिक विदयार्थी सहभागी झाले होते. ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक संभाजी काटकर, शैक्षणिक , ऍडमिशन प्रवेश आणि प्रशासनाचे प्रमुख प्रा. उद्धव शिद यांचे मार्गदर्शन लाभले. मैनेजमेंट इंस्टिट्यूटसचे हेड प्रा.डॉ. ऋषिकेश काकांडीकर, प्रा. अयूब तांबोळी, डॉ. अजित काटे, प्रा. निलेश मगर, प्रा. विजय शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
Republic Day: पुण्यात ३७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी साकारली ५ महापुरुषांची मानवी प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 2:27 PM