पुणे : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९० हून अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या कुटूंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केली.
अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची, तात्पुरत्या निवाऱ्याची, अन्न-पाण्याच्या पुरवठ्याची, तसेच दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झोपडपट्टी भागातील वीज व गॅससारख्या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून अग्निसुरक्षा उपाय योजना करावी. या घटनेची तातडीने दखल घेऊन शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
चंदननगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी येथे लागलेल्या भीषण आगीत जवळपास 10 च्या वर सिलेंडर फुटले. सुमारे ९० च्यावर झोपड्या जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. जवळपास १०० च्या आसपास सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.