शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील ९८५ इंग्रजी माध्यमातील पंचवीस टक्के आरक्षित जागांची आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या १४ हजार ७७३ जागा उपलब्ध असून आत्तापर्यंत या जागांवरील प्रवेशासाठी ४७ हजार ९३६ म्हणजेच तिपटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यात आरटीईच्या सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यंदा आरटीई प्रवेशाच्या एकूण उपलब्ध जागांमध्ये घट झाली असून प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला आरटीईमधून प्रवेश मिळावा, या उद्देशाने पालकांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ९ हजार ४३२ शाळा ९६ हजार ६८८ जागांसाठी आत्तापर्यंत १ लाख ८६ हजार ३५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीतून प्रवेश मिळवून देतो, असे खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणा-या एजंटपासून सावध राहा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.