लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना विषाणूचे दररोज नवनवीन व्हेरियंट समोर येत आहेत. नवीन व्हेरियंटविरोधात लसी प्रभावी ठराव्यात, यासाठी तिसरा डोस द्यावी लागण्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या बऱ्याच देशांनी ज्येष्ठ नागरिकांना लसीचा तिसरा डोस देण्याचे नियोजन केले आहे. सर्वत्र तिसऱ्या डोसची चर्चा सुरु असताना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५२ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. २ लाख ३८ हजार १९१ ज्येष्ठ नागरिकांचा अद्याप एकही डोस झालेला नाही.
अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी कोरोना विषाणूचे नवे व्हेरियंट, एकामागून एक येणाऱ्या लाटा आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोरोनावरील लसीचा तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातही तिसरा डोस देण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी सुतोवाच केले होते. जिल्ह्यात ६० वर्षांवरील १३ लाख ३२२ अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यापैकी १० लाख ६१ हजार १३१ ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस झाला. एकूण ६ लाख ७२ हजार ४७७ ज्येष्ठांचा दुसरा डोस झाला आहे. पहिला डोस झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ७७ टक्के, तर दोन्ही डोस झालेल्यांचे प्रमाण ५२ टक्के आहे. सुमारे सव्वा सहा लाख ज्येष्ठांचा एकही डोस झालेला नाही.
जिल्ह्यात लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक यांचे लसीकरण सुरु झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. इतर आजारांमुळे तसेच वयोमानानुसार ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो. अमेरिकेत ६० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही साथीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला. त्यामुळे २० सप्टेंबरपासून तिसऱ्या डोसला सुरुवात होणार आहे. भारतातही केरळ राज्यात संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.