लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्यानंतर, राज्यात सर्वप्रथम पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु, त्याकडे सुरुवातीपासूनच पुणेकरांनी दुर्लक्ष केले. पुणे पोलिसांनी अनेकदा नागरिकांना आवाहन केल्यानंतरही लोक रस्त्यावर येत होते. त्यानंतर पोलिसांनी रस्तोरस्ती नाकाबंदी करून प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यातून आतापर्यंत ६३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय ८२ हजार ७६ जणांवर विनामास्क कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुल केला आहे.
पोलिसांकडून सूट
संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर जाण्यासाठी सवलत दिली होती. त्याचा गैरफायदा घेऊन लोक या काळात कोठेही जात होते. पोलिसांनी अडविले तर काहीही कारणे सांगत होते. त्यातून पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद होत असल्याने पोलिसांनी सकाळी ११ नंतर संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
शहरात संचारबंदी असली, तरी मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. बागा बंद असल्याने अनेक उपनगरात लोक पहाटेपासून रस्त्याच्याकडे फिरायला जाताना दिसतात. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय आणि गर्भश्रीमंत असलेल्या कोरेगाव पार्क, गंगाधाम, एनआयबीएम वानवडी या परिसरात सकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. अनेक जण फिरताना तोंडावर मास्क लावताना दिसले नाही. अनेक जण रस्त्याच्या कडेला उभारलेल्या जिमवर व्यायाम करताना आढळून आले. यात प्रामुख्याने तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर दिसली. प्रामुख्याने श्रीमंत वर्गात मोडलेले जाणारे नागरिकच माॅर्निंग वॉकला बेधडकपणे जात असल्याचे आढळून आले. सायंकाळीही नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरायला बाहेर पडत असतात. या नागरिकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने उपनगरामध्ये हे प्रमाण अधिक आहे.
मॉर्निंग वॉकपेक्षा कुत्र्याला फिरवून आणणे महत्त्वाचे
अनेक जणांच्या दृष्टीने कुत्र्याला फिरवून आणणे अधिक महत्त्वाचे असल्याचे दिसून आले. पाळीव कुत्र्याने घरात घाण करू नये, यासाठी बहुतांश जण कुत्र्याला घेऊन सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना दिसतात. स्वत:साठी नाही तर कुत्र्यासाठी ते बाहेर पडत असल्याचे दिसत होते.
आम्ही सर्व काळजी घेतो
दिवसभर घरात बसून शारीरिक हालचाली होत नाही. डोंगरावर मोकळ्या हवेत फिरले तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे आम्ही सर्व काळजी घेऊन फिरायला येतो, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
पेट्रोल १०० रुपये झाले असताना विनाकारण कोण फिरेल ?
कोरोनाचा सावट असले, तरी काम करणे आवश्यक आहे. विनाकारण बाहेर फिरू नका असे सांगितले जात असले, तरी १०० रुपये लिटर पेट्रोल झाले असताना लोक विनाकारण का फिरतील, असा प्रश्न एका तरुणाने उलट केला. लोकांचे उत्पन्न कमी झाले असताना विनाकारण फिरून वर पोलिसांचा ५०० रुपये दंड भरायला लोकांकडे पैसेच नाहीत. काम असल्यामुळेच लोक घराबाहेर पडत असतात, असे या तरुणाने सांगितले.