पिंपरी : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित मेट्रो मार्गाची पाहणी केली. पुणे- मुंबई महामार्गावर सध्या बीआरटी मार्ग असून, दापोडी ते निगडीपर्यंत दोन-तीन उड्डाणपूल येतात. त्यामुळे रस्त्यापासून विशिष्ट उंचीवरून (एलिव्हेटेड) ११ किलोमीटरचा मेट्रोचा मार्ग असेल. उर्वरित भागात (अंडरग्राऊंड) भुयारी मार्ग, तर ११ किमी टप्प्यात एलिव्हेटेड मेट्रो मार्ग करणे शक्य आहे, असे मत दीक्षित यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मेट्रोचा मार्ग सुकर बनला असून, मोरवाडीत मेट्रो स्टेशन करता येईल, असे त्यांनी सूचित केले आहे. पिंपरी-चिंचवडमधून जाणारा मेट्रोचा मार्ग ७.१५ किलोमीटरचा आहे. एलिव्हेटेडचे ये-जा करण्यासाठी दोन ट्रॅक असतील. पिंपरी ते शेतकी महाविद्यालय शिवाजीनगर हा मार्ग एलिव्हेटेड असेल, तर कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा पाच किलोमीटरचा मार्ग भूयारी असेल. दापोडी ते निगडी या मार्गावर पुणे-मुंबई महामार्गावर दोन स्वतंत्र लेन बीआरटीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा अद्याप बससाठी वापर झालेला नाही. या मार्गाचा उपयोग मेट्रोसाठी कसा होऊ शकेल, या दृष्टीनेही विचार केला जाणार आहे. बीआरटी आणि अन्य मार्गांवर उंच पुलावरून मेट्रो मार्ग जाणार असल्याने भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)विनाअडथळा, जलद वाहतूक सेवाबीआरटीनंतर आणखी जलद वाहतूक सेवा देणारा मेट्रो मार्ग पिंपरी ते कृषी महाविद्यालय, शिवाजीनगरपर्यंत होणार आहे. रस्त्यापेक्षा किती तरी पट उंच पुलावरून मेट्रोचे ट्रॅक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बीआरटी आणि नेहमीच्या वाहतूक व्यवस्थेतील पुलांचा कसलाही अडथळा मेट्रोला येणार नाही. बीआरटी बसने अवघ्या २० मिनिटांत निगडी ते दापोडी अंतर कापणे शक्य होणार आहे. परंतु, मेट्रो सुरू झाल्यास विनासिग्नल अवघ्या १० मिनिटांत शिवाजीनगरचा प्रवास करणे शक्य होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अत्याधुनिकता आणल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
मोरवाडीत मेट्रो स्टेशन
By admin | Published: December 27, 2016 3:23 AM