पुणे : मशिदीत फक्त मुस्लिमांनाचा प्रवेश दिला जाताे. तिथे काहीतरी गुढ असणार, अल्लाहचा फाेटाे किंवा मुर्तीसमाेर नमाज पढला जात असेल अशा सर्व समजुतींचं निराकरण पुण्यातील इस्लामिक रिसर्च सेंटरकडून करण्यात आले. या संस्थेतर्फे विजीट अवर माॅस्क हा दाेन दिवसीय आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्व वयाेगटातील पुरुष आणि महिलांना मशिदीची संपूर्ण माहिती थेट मशिदीत जाऊन देण्यात आली. जवळपास तिनशेहून अधिक नागरिकांनी मशिदीला भेट देऊन इस्लाम घर्म समजावून घेतला. हा उपक्रम सामाजिक सलाेख्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. पुण्यातील कॅम्प भागातील आझम कॅम्पस मशिदीमध्ये या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या उपक्रमात इस्लामच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेची माहिती लोकांना देण्यात आली. वजू म्हणजे काय? नमाज़ म्हणजे काय? अज़ान म्हणजे काय? काबा कश्याला म्हणतात यासारख्या इस्लाम मधील प्रचलित बाबी लोकांना समजावून सांगत त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनाही मशिदीत खुला प्रवेश देण्यात आला. अनेकांनी कुराणबद्दल माहिती आवर्जुन जाणून घेतली. या उपक्रमात विविध जाती धर्माचे लाेक सहभागी झाले हाेते. मुस्लिम धर्मीय प्रार्थनास्थळाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या मशिदीला भेट देणारी अंकिता आपटे म्हणाली, या उपक्रमामुळे इस्लाम घर्माबाबत असलेले गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना दूर हाेण्यास मदत झाली. यातून नवीन माहिती मिळाली.
या उपक्रमाबाबत बाेलताना इस्लामिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, लाेकांनी मशिद आतून कशी असते हे कधी पाहिले नव्हते. मशिदीमध्ये नेमके काय असते याबाबत नागरिकांमध्ये कुतुहूल हाेते. त्याचबराेबर अनेकांच्या मनात मशिदीबद्दल अनेक गैरसमज देखिल आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत मशिदीबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. तसेच मशिदीबाबदच्या त्यांच्या सर्व शंकांचे निरसण यावेळी करण्यात आले. पुण्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला हाेता. यापुढेही असा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे.