राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
राजगुरुनगर शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे पााण्यावर शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही मात्र. सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाची पाणवनस्पतीचा थर साचला आहे. केदारेश्वर बंधाऱ्यातही थोड्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने पाणी खराब झाले असून नदीला येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे बंधाऱ्यात शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी योग्य राहले नाही.
नगर परिषेदेची सध्याची पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने लोकांना अर्धवटच स्वच्छ होणारे हे खराब पाणी वापरावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी हे पाणी वापरण्याचे जवळपास बंद केले आहे. त्यामुळे राजगुरुनगरला मिनरल वॉटरच्या प्लास्टिक जारची जोरदार विक्री सुरू आहे. गरीब नागरिकांना हे पाण्याचे जार परवडत नसल्यामुळे ते आसपासच्या विहिरीतून पाणी आणून गरज भागवत आहे. त्यामुळे भरपूर पाणी असतानाही, अव्यवस्थेमुळे लोकांचे हाल होऊन खर्चही वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा नदीत पाण्याचा प्रवाह सुरु असतो तेव्हा पाणी बऱ्यापैकी शुध्द असते. नदीची धार व प्रवाह बंद झाली की बंधाऱ्याचे डबके होऊन पाणी खराब होते.
१७ राजगुरुनगर
राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ तयार होऊन पाणी खराब झाले आहे.