लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साहेब, माझे मेडिकल बिल कधी मंजूर होणार, दीर्घ रजेसाठी अर्ज केला आहे, तो मंजूर झाला का, ७ व्या वेतन आयोगाचा फरकाबाबतची माहिती मुंबईला पाठविली का अशा चौकशीचे सर्वाधिक कॉल पोलिसांच्या समाधान हेल्पलाईनवर आलेले दिसून येतात. गेल्या वर्षी आपल्या तक्रारी, चौकशीसाठी या हेल्पलाईन ६९६ वर पोलिसांनी संपर्क साधला होता. या सर्व कॉलमधून करण्यात आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. त्याचवेळी ६०५ सेवानिवृत्त पोलिसांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या कामाबाबत चौकशी केली होती. त्यांच्याशी तक्रारींची पूर्तता करण्यात आली आहे.
पोलीस रस्त्यावर उतरून काम करीत असल्याने अनेकदा कार्यालयीन बाबी पूर्ण करताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. त्याबरोबर शिस्तीचे हे खाते असल्याने कोणत्याही बाबींची तक्रार करताना त्यांना मर्यादा येत असतात. त्यामुळे पोलिसांच्या तक्रारीसाठी पुण्यात समाधान हेल्पलाईन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या हेल्पलाईनवर सेवानिवृत्त पोलीस तसेच सध्या कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आपल्या तक्रारी करू शकतात. त्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली स्वतंत्र पोलीस कर्मचारी आलेल्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी नेमण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. तसेच, अनेकांना रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. त्यांचे मेडिकल बिलांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गेल्या वर्षी मेडिकल बिलाबाबत चौकशी करणारे सर्वाधिक कॉल हेल्पलाईनवर आले होते. त्या खालोखाल दीर्घ रजेच्या अर्जाची स्थिती काय आहे, कधी मंजूर होणार, याची चौकशी करणारे कॉल आले होते. दीर्घ रजेची मंजुरीबाबत गॅझेटमध्ये नोंद केली जाते. त्यात एकावेळी अनेकांच्या रजेची नोंद घेतली जाते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्र्यांकडून करण्यात आलेल्या कॉलमध्ये सर्वाधिक कॉल हे ग्रॅच्युटीचे काम झाले का, ट्रेझरीला कळविले का, सातव्या वेतन आयोगाचा फरकाबाबतची माहिती मुंबई कार्यालयाला पाठविण्यात आली का, ते कधी मंजूर होऊन येईल, अशा स्वरूपाची चौकशी करणारे होते.
........
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २०२० मधील कॉल - ६०५
सर्व कॉलची पूर्तता
जानेवारी २०२१ मधील कॉल - १०६
६ कॉल प्रलंबित
कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचे २०२० मधील कॉल - ६९६
सर्व कॉलची पूर्तता
जानेवारी २०२१मधील कॉल - ६६
एक कॉल प्रलंबित